अकोला – अकोल्यातील जुन्या शहर भागात दोन गटांत दंगल झाली. समाज माध्यमावरील एका वादग्रस्त पोस्टवरून झालेल्या वादानंतर दोन गटांत दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. यात एकाचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले.
वादग्रस्त पोस्टप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एक गट हरिहरपेठ भागात राजराजेश्वर सेतू इथे रस्त्यावर उतरला. त्यांनी दगडफेक करत गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली.यामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाकडून एक घरही पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. यात १० पेक्षा जास्त जण जखमी झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात कलम १४४ लागू केले असून रामदास पेठ पोलिसांनी संबंधित व्यक्तिवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांना नागरिकांना शांततेचं आवाहन केले. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलीस, प्रशासनाला सहकार्य करा असेही म्हटले आहे.
सध्या हरिहरपेठसह संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. शहरात कलम १४४ लागू केले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत.याशिवाय अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्याचे म्हटले आहे.
या दंगलीला पोलिसांची उदासीनता कारणीभूत असल्याचे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्याची तक्रार करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिलोय. तर ‘अकोल्यातील घटना छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती सारखी भाजप पुरस्कृत होती का? याची सीबीआय चौकशी करावी, तसेच पोलीस अधीक्षकांच्याही ढिसाळ कारभाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.