लेह – भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर विमान मंगळवारी काही तांत्रिक बिघाडामुळे लेह विमानतळाच्या धावपट्टीवर अडकले. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. याबाबत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सी १७ हेवी लिफ्ट वाहतूक विमानात बिघाड झाला होता. त्यामुळे विमान लेह विमानतळाच्या धावपट्टीवर ठप्प झाले होते. दरम्यान, मंगळवारी संपूर्ण दिवस हे विमान हलवण्याची प्रक्रिया सुरू होती. यांनतर आज सकाळी रनवेवरून इतर उड्डाणे सुरू झाली.
कुशोक बकुला रिनपोछे विमानतळावर सी १७ ग्लोबमास्टर विमान नादुरुस्त झाल्यामुळे, रनवे संपूर्ण दिवस ब्लॉक करण्यात आला होता. या काळात विमानतळावरून कोणतेही टेक ऑफ किंवा लँडिंग होऊ शकले नाही. मंगळवारी लेह विमानतळाच्या वतीने ट्वीट करून माहिती दिली की, “विमानतळावरील जवळपास सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही समस्या दूर करून १७ मेपर्यंत वेळापत्रकानुसार उड्डाणे सुरळीत करण्यासाठी काम चालू आहे. वेळोवेळी परिस्थितीनुसार पुढील अपडेट्स दिले जातील.” काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या समस्या सांगितल्यावर एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ट्विटरवर प्रवाशांशी संपर्क साधला.