*पोलिस आयुक्तांचा मंडळांना इशारा
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी भव्यदिव्य मंडप आणि कमानी उभारण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडप आणि कमानी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.
लाडक्या गणरायाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंडळांकडून भव्यदिव्य मंडपाच्या उभारणीचे काम सुरू आहे. मंडप उभारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस आयुक्तालय व महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक मंडळांना अटी-शर्थींनुसार परवानगी दिली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करून मंडप व कमानीची उभारणी केली जात असल्यास, संबंधित मंडळांवर पोलिस आयुक्तालयातर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले आहे. त्यासंदर्भात पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना मंडळांच्या मंडपाची उभारणी आणि कमानी यांचा वाहतुकीला अडथळा होणार नाही याबाबत पाहणी करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.