विठ्ठलचरणी आजपासून
तुळशी अर्पण करता येणार

सोलापूर : हिंदुस्थानची \’दक्षिण काशी\’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गेल्या अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या मागणीची अखेर पूर्तता झाली. गुढी पाडव्यापासून पंढरपुरात विठुरायाच्या (चरणी तुळशी पत्र) तुळशी अर्चन पूजेस सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. ज्याला महापूजा, पाद्यपूजा करता येत नाही, अशा भाविकांना ही पूजा करता येणार आहे.

देवाच्या महापूजेसाठी आणि पाद्यपूजेसाठी भाविकांमध्ये मोठी मागणी असते. मात्र या पूजा मर्यादित संख्येत असल्याने पूजेसाठी भाविकांचा नंबर लागत नाही. यासाठी भाविकांकडून सातत्याने किमान तुळशी अर्चन पूजा सुरू करण्याची मागणी होत होती. मंदिर समितीने हा निर्णय घेतल्याने आता सण आणि महत्वाचा यात्रा कालावधी वगळता, रोज येणाऱ्या भाविकांना दिवसातून ३ वेळा पूजा करता यावी, अशी व्यवस्था समितीने केली. या प्रत्येक वेळेत किमान १० कुटुंबाना ही पूजा करता येणार आहे. या पूजेसाठी एका कुटुंबाला २१०० रुपये मंदिर समितीकडे भरावे लागणार आहेत. यात देवाची पूजा, दर्शन आणि प्रसाद असा तिहेरी लाभ या भाविकांना मिळणार आहे.

Scroll to Top