नाशिक – जिल्ह्यातील देवळाली कॅम्प तालुक्यातील दोनवाडे येथील नानेगाव शिवारात विष्णु पावसे यांच्या उसाच्या शेतावरून गेलेल्या विद्युत तारा तुटून पडल्या. तारा तुटल्याने झालेल्या घर्षणामुळे आग लागून अडीच एकरातील उभा उस जळून खाक झाला.
विष्णु पावसे यांच्या नानेगाव शिवारातील गट नं. ८३१/ ११ येथे शेतावरून महावितरणच्या मुख्य विद्युतवाहिनीच्या तारा गेल्या आहेत.या तारा अचानक तुटल्याने झालेल्या घर्षणामुळे ठिणग्या उडू लागल्या.या ठिणग्या उसावर पडल्याने उसाने पेट घेतला. हा हा म्हणता वार्यामुळे अख्खे शेत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. याप्रकरणी महावितरण कंपनी आणि महसुल विभागाने या घटनेचा पंचनामा करून पीडित शेतकरी विष्णु पावसे यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.