मुंबई – विधवा महिलांना आता ‘गंगा भागिरथी’ असे संबोधावे, असा प्रस्ताव राज्याचे महिला व बालविकास मंत्री भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे. या प्रस्तावानुसार निवेदन तयार करण्याचे आदेश त्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून दिले. ही बाब उघड झाल्यावर या प्रस्तावाला सर्व स्तरातून कडाडून विरोध होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी अपंगऐवजी दिव्यांग ही संकल्पना मांडली होती. त्यामुळे दिव्यांग बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळाले आणि समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवाऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी, असे लोढा यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र गंगा भागिरथी या शब्दाला जोरदार विरोध सुरू झाला आहे. केवळ शब्दप्रयोग बदलून या महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. खास करून सोशल मीडियावरून महिलांनी खरमरीत शब्दांत विरोध आक्षेप नोंदवला. विधवा गंगा भागिरथी तर मग विधुर पुरुषांना काय म्हणायचे, असा प्रश्नही नेटकर्यांनी उपस्थित केला. भाजपाची मनुस्मृती पुन्हा आणण्याची ही चाल आहे, अशीही टीका होत आहे . उद्या केशवपनही करायला लावतील आणि सती जायचेही समर्थन करतील, अशी टीका अनेकांनी केली. हिंदू विधवांसाठी हा शब्द वापरल्यास मुस्लीम समाजातील विधवा महिलांना काय म्हणायचे, असा सवाल नेटकर्यांनी विचारला.
नव्या नावाची सूचना हास्यास्पद आहे. आपण शंभर वर्षे मागे जात आहोत, आधी सौभाग्यवती हे बिरुद गेले पाहिजे, नामसंबोधनामुळे तशा स्त्रिया पटकन लक्षात येऊन त्यांचे अशुभ मुखदर्शन टाळता येणे वगैरे संस्कृतीसंरक्षक गोष्टींना चालना मिळेल असे अनेक आक्षेप घेतले गेले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, विधवा हा शब्द कटू वाटतो. त्यावर चर्चा होऊ शकते. एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते, तेव्हा तुम्ही पुरुषांना काही विशेष संबोधता का? तुम्ही समतेची भाषा करता मग विधवा महिलांना विशेष नाव देणे हा त्या महिलांवर अन्याय नाही का? असा जाब विचारला. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले की, हा प्रस्ताव आणण्याच्या हेतूमागे महिलांचा सन्मान नसून महिलांना अपमानित करण्याचा मनुवादी हीन
हेतू आहे. सर्व स्तरातूनच प्रस्तावाला तीव्र विरोध होऊ लागल्यावर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन असा खुलासा केला की, आपण ही सूचना केली नसून महिला आयोगाने पत्र पाठवले आहे. त्यात हे शब्द आहेत. हे पत्र मी पुढे पाठवले आहे. परंतु या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही किंवा जीआर निघालेला नाही. या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.
विधवांना आता गंगा-भागिरथी म्हणायचे भाजपाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध
