गंगाखेड – राजस्थानच्या अलोर येथे भारतीय लष्कराच्या तांत्रिक विभागात सेवेत असलेले जवान लक्ष्मण तांदळे (34) यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता गंगाखेड तालुक्याच्या तांदुळवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम, जवान लक्ष्मण तांदळे अमर रहेच्या घोषणांनी तांदूळवाडी परिसर अक्षरशः गहिवरला.
तांदळे यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावरून सुभेदार रवींद्र पवार (औरंगाबाद) आणि हवालदार प्रशांत यांच्या पथकाकडून गंगाखेड शहरात दुपारी १ वाजता आणण्यात आले. शहराच्या महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालयापर्यंत माजी सैनिक संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वीर जवान तांदळे यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर दुपारी गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मोठे भाऊ डॉ. केशव यांनी त्यांना मुखाग्नी दिला.