मुंबई – मुंबईहून मोठ्या संख्येने ख्रिस्ती भाविक तामिळनाडू राज्यातील वेलंकनी येथील वार्षिक महोत्सवासाठी जातात. या भाविकांकडून पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली जाते. यंदा ही मागणी पूर्ण होणार असून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने वेलंकनीसाठी वांद्रे ते वसई मार्गे विशेष रेल्वेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ख्रिस्ती भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वेलंकनी हा महोत्सव आठ दिवस चालतो. वेलंकनी मातेच्या वाढदिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी त्याची सांगता करण्यात येते. या उत्सवाकरिता वेलंकनीस जाण्यासाठी पश्चिम रेल्वे वांद्रे ते वसई मार्गे २७ ऑगस्ट रोजी विशेष गाडी सोडणार आहे. या ट्रेनचे बुकिंग उद्यापासून सुरू होणार आहे. वेलंकनी भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन वेलंकनी यात्रेकरू संघटनेचे समन्वयक चार्ली रोझारिओ यांनी केले आहे.
वेलंकनी हे तीर्थक्षेत्र तामिळनाडू राज्यातील नागापटिनमजवळ आहे. येथे आरोग्यदायिनी मातेच्या म्हणजेच मदर मेरीच्या सन्मानार्थ व वाढदिवसाच्या निमिताने आठ दिवस सामूहिक प्रार्थना केली जाते. यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात भाविक जातात. वेलंकनी माता ही भक्तांना पावते, अशी भाविकांची दृढ श्रध्दा आहे. बरेच भाविक नवस फेडण्यासाठी याठिकाणी दरवर्षी जातात.
वेलंकनी महोत्सवासाठी वांद्रेहून विशेष ट्रेन
