मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही असे ठासून सांगितले. तरीही आज राजकीय भूकंपाची चर्चा सुरूच होती. एकीकडे अजित पवारांनी त्यांच्या गटातील नेत्यांची बंगल्यावर बैठक घेतली तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आज पुन्हा म्हणाले की, दोघांची इच्छा आहे. वेळ येईल, पण वरचा ब्राह्मण कडक आहे.
अजित पवार यांनी आज सकाळीच देवगिरी बंगल्यावर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली. कालही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. मात्र त्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार असे दोघेही उपस्थित नव्हते. तिकडे अजित पवार राष्ट्रवादी सोडणारच असे काल ठामपणे सांगणारे गुलाबराव पाटील आज म्हणाले की, दोघांची इच्छा आहे, पण गुण जुळत नाहीत. तिथी जुळत नाही. गुण जुळण्यासाठी काय करावे? गुण जुळले की वेळ पुन्हा येईल. पण वरचा ब्राह्मण फार कडक आहे.
त्याचवेळी कालपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब आहेत असे म्हटले जाऊ लागले. याला उत्तर देताना मंत्रालयात काम करतो आहे, कोणतेही काम पेंडींग ठेवत नाही असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी दोन फोटो पोस्ट करीत केले. मात्र यावरूनही चर्चा रंगली. देवेंद्र फडणवीस हे घाईने फायली हातावेगळ्या करीत आहेत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. शरद पवार हेही आता भूकंप टाळण्यासाठी सक्रीय झाले असून आमदारांना फोन करीत आहेत अशीही चर्चा निर्माण झाली.
अजित पवार-संजय राऊत
फटाके जोरात फुटू लागले
राजकीय भूकंप आणि मविआ फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न या विषयावर संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ लिहिल्यापासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात वादाचे फटाके जोरात फुटू लागले आहेत. काल अजित पवार संतापून म्हणाले की, बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते कधी झाले? आमची बाजू मांडण्यास आम्ही खंबीर आहोत. आम्हाला कोट कसे करता? तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाचे बोला. मविआच्या बैठकीत मी विचारणार आहे. आमचे वकीलपत्र कुणी घ्यायची गरज नाही.
यावर उत्तर देत संजय राऊत म्हणाले की, मी खरे सांगितले म्हणून मला टार्गेट करीत असले तर मी खरे बोलतच राहणार आहे. मविआत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे यात चूक काय आहे. हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड या सर्वांना विचारा की त्यांच्यावर दबाव आहे की नाही. मी जे बोललो त्यामुळे भाजपाने चिडायला हवे होते. ते माझ्यावर का चिडतात? मी मविआचा चौकीदार आहे. मी बोलत राहणार, भूमिका मांडत राहणार आहे. ते कोण आले मला विचारणारे, मी फक्त शरद पवारांचे ऐकतो. बाकी कुणाच्या बापाचे ऐकत नाही. ही खडाजंगी शरद पवारांच्या हस्तक्षेपाने लवकरच थांबेल.
वेळ येईल, पण वरचा ब्राह्मण कडक चर्चा सुरूच! अजित पवार गटाची बैठक
