मुंबई
वैद्यकीय शिक्षण विभागाला आशियाई विकास बँक ४१०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. आरोग्य सेवा अधिक बळकट व्हावी व नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी याहेतूने हा निधी देण्यात येणार आहे. या अंतर्गत मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम (पीजी) चालू करण्यासह सुपरस्पेशालिटी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.
आशियाई विकास बँकेतर्फे मिळणाऱ्या निधीतून सध्या काही वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरू करण्यात आली आहेत. त्यात आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नव्याने मिळणाऱ्या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये जळगाव, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय परभणी, रत्नागिरी, अमरावती, गडचिरोली, भंडारा आणि अंबरनाथ या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.