शरद पवारांनी अदानींची पुन्हा पाठराखण केली
20 हजार कोटी आकडा कुठून आला? तेही ठाऊक नाही!

मुंबई – काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे गेले काही महिने अदानी समूहावर तुटून पडत असतानाच शरद पवारांनी काल अदानींची पाठराखण केली. आजही पत्रकार परिषदेत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अदानीला मुद्दाम टार्गेट केले जात आहे असे ते पुन्हा बोलले. काँग्रेस, ठाकरे गट यांनी यावर सावध भूमिका घेत अदानीबद्दल पवारांचे मत वेगळे असू शकते असे म्हटले, पण शरद पवार अचानक अदानीला जाहीर पाठिंबा का देऊ लागले? याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आज राहुल गांधी यांनी पुन्हा अदानीविरोधात ट्विट करीत म्हटले की, ‘सच्चाई छुपाते है, इसलिए रोज भटकाते है। सवाल वही है-अदानी की कंपनीयों मे 20,000 कोटी बेनामी पैसे किसके है।’ या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी कोडे टाकले आहे. त्यात गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा, अनिल अ‍ॅटनी यांची नावे आहेत. त्यामुळे काँग्रेसचा अदानीविरोध कायम राहणार हे उघड आहे. राज्यात नाना पटोले यांनी हीच भूमिका घेतली. या घडामोडींनंतर 14 एप्रिल रोजी पुण्यात मविआची सभा आहे. या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अदानी हे विषय घेतले जातात का, याकडे
सर्वांचे लक्ष आहे.
काल आपल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नाही, अदानी यांना जाणुनबुजून टार्गेट केले जात आहे, असे वक्तव्य केले होते. आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पुन्हा अदानी यांची पाठराखण करीत अदानी प्रश्न महत्त्वाचा नसून बेरोजगारी, संकटात आलेली शेती, महागाई हे तीनच प्रश्‍न महत्त्वाचे आहेत, असे सांगून हिंडेनबर्ग या परदेशी कंपनीवर विश्वास ठेवण्यापेक्षा भारतीय समितीवर विश्वास ठेवायला हवा, असेही वक्तव्य केले.
शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे. मात्र शरद पवारांच्या विधानामुळे मित्रपक्ष असलेला काँग्रेस आणि ठाकरे गट चांगलाच अडचणीत आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सर्वांना सावरत म्हणाले की, शरद पवारांची भूमिका आधीपासूनची आहे, त्यात नवीन काही नाही. संसदेत महागाईवरून तृणमूल-राष्ट्रवादीने वेगळी भूमिका
घेतली होती.
पवार साहेबांनी अदानींसंदर्भातही वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत. एलआयसी आणि स्टेट बँकेमधील पैसे हे जनतेचे पैसे आहेत. ते भाजपने आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या घशात कशा प्रकारे घातले आहे आणि एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देशाची शक्ती कशी पणाला लावत आहेत हेदेखील अदानी प्रकरणातून समोर आले आहे. न्यायालयीन चौकशी ठीक आहे, पण आम्ही अदानीच्या जेपीसी चौकशीवर ठाम आहोत. शरद पवारांचे मत वेगळे असू शकते.
शरद पवार यांची पत्रकार परिषद
अदानी समूहाची जेपीसीकडून चौकशी व्हावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत संसदेचे काम बंद पाडले. त्यात राष्ट्रवादीचे
खासदारही होते.
शरद पवार – संसदेत कामकाज होत नाही, हे योग्य नाही. माझे खासदारही जेपीसी चौकशी मागणीसाठी संसदेत आंदोलन करीत होते. परंतु कामकाज झाले पाहिजे. जेपीसी चौकशी नको, कोर्टाने चौकशी करावी असे माझे मत आहे.
हिंडेनबर्ग अहवालाने खळबळ माजवली आहे.
शरद पवार – हिंडेनबर्ग कोण आहे, याची माहिती नाही. परदेशी कंपनीवर विश्वास ठेवण्यापेक्षा भारतीय समितीवर विश्वास ठेवू.
अदानीविरोधात काँग्रेस रोज पाच प्रश्न विचारत होती
शरद पवार – अदानीला टार्गेट केले जात आहे. आधी टाटा-बिर्ला यांना टार्गेट केले जायचे. आता अंबानी-अदानीला टार्गेट करतात. अदानीचे वीजपुरवठा क्षेत्रात मोठे योगदान आहे. उद्योग आले नाहीत तर चालणार नाही.
अदानीकडे वीस हजार कोटी कुठून आले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
शरद पवार – अदानी विषय महत्त्वाचा नाही. बेरोजगारी, संकटात आलेली शेती, महागाई हे तीनच प्रश्न महत्त्वाचे आहेत. वीस हजार कोटींची आकडेवारी माझ्याकडे नाही. मी माहिती घेऊन मग बोलेन.
अजित पवार नॉट रिचेबल आहेत?
शरद पवार – मला माहीत नाही, ते माझ्या संपर्कात आहेत.
अदानीबाबत तुमच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षात फूट पडू शकेल.
शरद पवार- आम्ही 19 पक्ष एकत्र आहोत. अनेक विषयांवर आमचे मतभेद आहेत, पण तरी आम्ही एकत्र आहोत. नुकत्याच झालेल्या बैठकीत सावरकर या विषयावरही मी बोललो.
अदानीची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी व्हावी, अशी सर्वच विरोधी पक्षांची मागणी आहे.
शरद पवार – अशा समितीत सत्ताधारी सदस्यच अधिक संख्येने असतील. अशी समिती जो निष्कर्ष काढेल, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यापेक्षा न्यायालयाने गठीत केलेल्या समितीची चौकशी अधिक विश्वासार्ह ठरेल, असे माझे
मत आहे.

Scroll to Top