मुंबई – भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णयच जाहीर केला. शरद पवार यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. भावनाविवश झालेले राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी शरद पवारांना घेरून हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन पवारांना केले. मात्र शरद पवार मौन राहिले. सायंकाळपर्यंत वेगवान घडामोडी घडल्या आणि शरद पवारांना अध्यक्षपदी ठेवून राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे आणखी पद निर्माण करावे असा विचार सुरू झाला. सर्व दैनंदिन कारभार राष्ट्रीय कार्याध्यक्ष पाहतील असे सूचवण्यात आले. शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्या, असे कार्यकर्त्यांना संध्याकाळी सांगितले.
‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन समारंभ आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते या समारंभाला उपस्थित होते. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यादेखील त्यांच्या शेजारी बसल्या होत्या. या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी आपल्या साठहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आणि अचानक निवृत्तीचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधींनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक, क्षेत्रात काम करण्याचा माझा मानस आहे. मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो, तरी ही माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमानसात काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असेन, आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिन. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिन, असेही शरद पवार यांनी सांगितले. रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी पक्षातील सदस्यांची एक समिती स्थापन करावी, अशी सूचना करत पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा सोनिया दूहन आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल, असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी ही घोषणा करताच सभागृहातील वातावरणच बदलून गेले. कार्यकर्त्यांनी नाही नाही असे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साहेब निर्णय मागे घ्या, मागे घ्या असे सांगायला सुरुवात केली. त्यानंतर घोषणांचा आवाज वाढत गेला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार शरद पवार तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांभोवती कोंडाळे करून त्यांना समजवायला सुरुवात केली. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण हे नेते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले. जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड, दिलिप वळसे-पाटील, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, फौजिया खान, धनंजय मुंडे, विद्या चव्हाण असे राष्ट्रवादीचे नेते एकेक करून पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, हा निर्णय घेताना साहेबांनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. तुमच्याप्रमाणे आम्हीही भावूक आहोत. साहेबांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही केलीय. त्यांनी आत्ताच थोडे समाधान करून द्यावे. जयंत पाटील यांनी साश्रुनयनांनी सांगितले की, आम्ही पवारांच्या नावाने मते मागतो. ते बाजूला गेले, तर आम्ही कुणाचा आधार घ्यायचा, असे अचानक बाजूला जाण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही राजीनामा द्या. पक्ष ज्यांच्या हातात द्यायचा, त्यांना द्या. तुम्ही थांबणार असाल, तर आम्ही सगळे थांबतो. जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू आवरले नाहीत. त्यांनी म्हटले की, तुमच्यासारखा पुरोगामी माणूस मिळणार नाही. आता आमच्यापुढे एवढ्या अडचणी असताना आम्ही कुणाकडे जायचे, आमचे जीवनच व्यर्थ आहे. अनिल देशमुख यांनी आम्हाला पोरके करू नका, असे आवाहन केले.
छगन भुजबळ म्हणाले की, तुम्ही वयाचे सांगता ते मंजूर नाही. तुम्ही आमच्यापेक्षा दसपट काम करता. तुमचा राजीनामा देशात कुणी मान्य करणाार नाही. आम्हाला समिती वगैरे नको. सुनील तटकरे म्हणाले की, हा अत्यंत क्लेशकारक दिवस आहे. सर्वांना धक्का बसला आहे. सर्वांचे जीवन आपल्यावाचून व्यर्थ आहे. अंकुश काकडे यांनी साकडे घातले की, कार्यकर्त्यांना नाराज करू नका. दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टच सांगितले की, हा निर्णय मान्य नाही. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणे जरुरीचे आहे. नरहरी झिरवळ म्हणाले की, लोक विनंती करायला इथे येतील. आम्ही चुकलो असेल तर आम्हाला माफ करा. विद्या चव्हाण यांनी आग्रह केला की, माता-पिता बदलता येत नाहीत, तुम्ही ताबडतोब निर्णय मागे घ्या. धनंजय मुंडे म्हणाले की, देशातील प्रत्येक संकटातून आम्हाला वाचवले.
मात्र, पवार आपल्या भूमिकेवरून मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढत होती. तुम्ही अध्यक्षपद सोडू नका, अशी विनंती कार्यकर्ते करत होते. आपण निर्णय मागे घेत नाहीत, तोवर आम्ही सभागृह सोडणार नाही, असा हट्टच कार्यकर्त्यांनी धरला.
जवळजवळ दोन तास सभागृहात हुंदके, अश्रू आणि घोषणा यांचे वातावरण होते. त्यानंतर दुपारी अडीच वाजता प्रफुल्ल पटेल आणि इतर काही नेत्यांनी असे जाहीर केले की, पवार साहेबांना जेवायला जाऊ द्या. नंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढू आणि तुमच्या मनातला निर्णय त्यांना घ्यायला लावू.पण कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी अजित पवार, प्रफुल्ल पटेल या सर्वांनी पवारांना जेवायला जाऊ द्या, असे काहीसे चिडूनच सांगितले. त्यानंतर शरद पवार त्यांच्या सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी गेले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेतेही तिथून निघाले. कार्यकर्ते मात्र तिथून हटायला तयार नव्हते. त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणातच उपोषण सुरू केले. काही वेळाने अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी तिथे येऊन कार्यकर्त्यांना घरी जाऊन जेवून या, असे सांगितले. साहेब, टीव्हीवर बघताहेत. त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवले. परंतु कार्यकर्त्यांनी आम्ही उपाशी राहू, असे सांगितल्यावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोबाईलवरून शरद पवार यांचे म्हणणेही ऐकवले. परंतु कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडला.
राष्ट्रवादीचे सर्वच नेते सिल्व्हर ओकला पोचले. तिथे बैठक झाली आणि मग अजित पवार पुन्हा यशवंतराव प्रतिष्ठानला आले. ते म्हणाले की, शरद पवारांनी सांगितले आहे की, मी माझा निर्णय दिला आहे. मात्र तुम्हा कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन मला पुन्हा विचार करायला दोन दिवस द्या. त्याचवेळी राजीनामा सत्र
थांबले पाहिजे.
शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर संध्याकाळपर्यंत इतर पक्षांतील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या. संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ’एक वेळ अशी आली घाणेरडे आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी राजकारणाचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनीही तेच केलं आहे. जनतेच्या रेट्यामुळं बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देखील देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. त्यांनी निर्णय मागे घ्यावा. शरद पवार यांच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ’हा शरद पवार यांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. शेवटी शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये मंथन सुरु आहे. एकदा नेमकी परिस्थिती काय आहे ते समोर आल्यावर बोलणे योग्य ठरु शकेल.’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले, ‘शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून राजीनामा का दिला? याचे कारण सांगणे अवघड आहे. शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा नेहमीच राष्ट्रवादीला झाला. मात्र राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे आहे. महाराष्ट्राने नेहमी तशीच भूमिका घेतली आहे. पवारांनी या विचारांना मानून नेहमी काम केले आहे. जो राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय असेल, जो अध्यक्ष होईल, तो मविआसोबत राहील, अजित पवार संदर्भातील बातम्या माध्यमातून येत होत्या. त्यानंतर ही निवृत्तीचे घेतली गेली याबद्दल आता फार बोलू शकत नाही. कारण निवृत्तीचे कारण माहीत नाही. ज्या विचारसरणीने पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला, त्याच विचारसरणीने हा पक्ष आमच्यासोबत पुढे जाईल. हा त्यांचा पक्षातील मामला आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ’हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणात त्यांना मानाचे स्थान राहील. या निर्णयाचा मविआवर कोणताही परिणाम होणार नाही.’
राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली. धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यासह काही पदाधिकार्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर हे राजीनामा सत्र थांबवावे, असे शरद पवार यांनी आवाहन केल्याचे संध्याकाळी सिल्व्हर ओकवरून परतल्यावर अजित पवार यांनी
कार्यकर्त्यांना सांगितले.
अजित पवारांचा वेगळा सूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते शरद पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत असताना अजित पवार यांनी मात्र वेगळा सूर लावला. त्यांच्या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संताप निर्माण झाला होता. सुप्रिया सुळे हिला गप्प बसायला सांगून अजित पवार म्हणाले की, शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षातच नाहीत असे नाही. पक्ष संपला असे काही करू नका. आपण नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी देण्याचे ठरवत आहोत. हे नेतृत्त्व शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम करील. पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. यामुळे उगाच भावनिक होऊ नका. आपण नवीन अध्यक्षाला साथ देऊ. साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्यांकाच्या मागे राहतील, असे का समजता? आम्ही सर्व जण आहोत. पक्षही आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना आमची सतत साथ राहील. आपल्या कुटुंबात कुणाचे वय झाले तर तो बाजूला होऊन शिकवण देतो, मार्गदर्शन करतो, तसेच साहेब करतील. पवार काकींनी आताच सांगितले आहे की, शरद पवार निर्णय मागे घेणार नाहीत. काळानुरूप निर्णय हा घ्यावाच लागतो. ही वेळ कधीनाकधी येणारच होती. आता साहेबांसमोर नवीन अध्यक्ष तयार झाला तर तो तुम्हाला का नको आहे? साहेब देशात फिरणारच आहेत, कार्यक्रमांना जाणारच आहेत, त्यामुळे भावनाविवश होऊ नका. कालच हा निर्णय जाहीर करणार होते. पण वज्रमूठ सभा आहे म्हणून आम्ही त्यांना थांबवले आणि त्यांनी आज निर्णय जाहीर केला. अजित पवारांनी हे वक्तव्य करून शरद पवारांच्या राजीनाम्याला स्पष्टपणे पाठिंबाच दिल्याने जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला होता.
शरद पवारांसाठी अंधारेंनी लिहिलेले भावनिक पत्र
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होत आहे, अशी घोषणा मंगळवारी शरद पवार यांनी केली. या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रचंड भावूक झाले. केवळ राष्ट्रवादी नाही तर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी पवार यांच्या निर्णयावर भाष्य केले आहे. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय निर्णयांवर भाष्य केले आहे. आपल्या पत्रात त्या लिहितात की …
सर नमस्ते,
खरंतर मी आपल्याला लिहावे किंवा सांगावे एवढी प्रज्ञा निश्चितच माझी नाही. पण तरीही सर, मोठ्या धाडसाने हे लिहिले पाहिजे. मी आपल्या पक्षाची कधीच साधी प्राथमिक सदस्यही नव्हते. पण आपला निर्णय एकूणच फक्त पक्ष म्हणूनच नाही तर, महाराष्ट्रातील बहुजन उपेक्षित तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणारा नेता म्हणून ज्यांना जाण आहे त्या कोणालाही मानवणार नाही.
सर, बदल हा सृष्टीचा नियम असतो जे काल होते ते आज असेलच असे नाही जे आज आहे ते उद्या राहीलच असे नाही पण असे असले तरी काही गोष्टीत लोकांना बदल अजिबातच मान्य नसतो महाराष्ट्राच्या बुजुर्ग व्यक्ती म्हणून आपला हा निर्णय अजिबातच न पटणारा आहे.
सर, कदाचित आपल्यानंतर आपल्या पक्षाला अध्यक्ष मिळतील आणि ते खूप निष्ठेने आणि प्राणपणाने पक्ष वाढीसाठी काम करतीलही, पण सर, माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेली मुलगी असेल, मोतीराज राठोड असतील, व्यंकप्पा भोसले असतील, इचलकरंजीचे पवार असतील, निलंग्याचे विलास माने असतील ही माणसं आपण उभी केलीत. कुणी काहीही म्हटले तरी रामदास आठवले हे नेतृत्व पहिल्यांदा आपल्या पारखी डोळ्यांनी हेरले. आपल्या पुढाकारामुळेच पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीतले चार खासदार एकत्रितपणे निवडून आले.
सर, एकीकडे ना धो महानोर यांच्यासारखे शेतीमातीशी नाळ असणारे जाणकार साहित्यिक आपल्या सभागृहात असले पाहिजे तर दुसरीकडे तीन दगडाच्या चुलीवरचे अन्न शिजवून खाणारे आणि जन्मभर भटकंती केली तरी मेल्यावर स्मशानभूमीचा प्रश्न उरावा अशा भीषण दुर्भिक्षातून उभे राहिलेले लक्ष्मण मानेंसारखे लोकही सभागृहात असावे हा सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण केला. सर, शेतीच्या सातबारावर घरातल्या पुरुषाइतकेच माय माऊलीचे सुद्धा नाव असले पाहिजे हा क्रांतीकारी निर्णयसुद्धा आपल्याच काळातला !
सर, कोणताही पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी चार गुणांची चतु:सूत्री एकत्र असणे अत्यंत गरजेचे असते. एक नेतृत्व, दोन वक्तृत्व, तीन विचारधारा, चार संघटन कौशल्य. आपल्या ठायी या चारही गुणांचा संगम आहे हे सत्य महाराष्ट्रात काय भारतातला कोणीही नाकारणार नाही. शतकातला नेता म्हणूनही आपला एक वेगळा उल्लेख आहे. आपल्या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षाचे काही नुकसान होत आहे का किंवा आपल्यानंतर या पक्षाचे नेतृत्व करण्यास कुणी सक्षम आहे किंवा नाही या सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही.
पण आपला अनुभव, प्रश्न हाताळण्याची हातोटी, कमालीचा संयम या सगळ्यांची आज गरज आहे एकूणच महाराष्ट्र आणि देश ज्या संक्रमण काळातून जात आहे त्या संक्रमण काळात हुकूमशाही आणि दमण यंत्रणेच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला एका ज्येष्ठ बुजुर्गाचे नुसते आशीर्वादच नाही तर मुत्सद्दी राजकारणाचा अनुभव आणि दिशादर्शक मार्गदर्शनही हवे आहे.
-प्रा. सुषमा अंधारे