जळगाव – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज जळगावात पत्रकार परिषदेत सनसनाटी दावा केला की, पुढील 15 ते 20 दिवसांत राज्याचे शिंदे सरकार कोसळणार आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांचे राज्य येत्या पंधरा ते वीस दिवसांत संपणार आहे. त्यांचा मृत्यूलेख तयार झाला आहे. आता फक्त सही करायचे बाकी आहे. हे सरकार फेब्रुवारीत पडणार असे मी म्हणालो होतो, पण न्यायालयाच्या निकालाला उशीर झाला. आता हे सरकार टिकत नाही.
15 मे पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होतील, अशी चर्चा आहे. त्यावेळी भाजपा फक्त अजित पवार व त्यांच्या सहकार्यांना सोबत घेतो की, संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच भाजपाला सत्ता स्थापनेत साथ देईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दुसरीकडे सत्तापालटाबाबत चार दिवसांपासून तापलेले वातावरण काही काळ निवळल्याचे जाणवत आहे. आज अजित पवार हे बारामतीच्या दौर्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पाऊस, महागाई, बेरोजगारी, खारघर दुर्घटना असे मुद्दे आहेत. या मुद्यांवरून लक्ष वळविण्यासाठी मविआत फूट पडत असल्याची चर्चा मुद्दाम घडवून आणत आहे. नवे सरकार येऊन नऊ महिने झाले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. 23 मंत्रिपदे रिक्त आहेत त्याचे काय?
शिंदे सरकारचा मृत्यूलेख तयार 15 ते 20 दिवसांत कोसळणार
