सांगली- सांगली येथील शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात पाऊस लांबल्यामुळे धूळवाफेवर केलेल्या भातपेरणीला विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी धूळवाफेवर भात बियांणाची टोकण व कुरी पद्धतीने लागण करण्यात आली होती. त्यानंतर मान्सुनपूर्व पाऊस पडला. मात्र हा पाऊस भात बियाणी उगवण्याइतपत झाला नाही.
यानंतर पाऊस पडेल या आशेवर बळीराजा होता. मात्र गेले दहा दिवस पाऊसच न पडल्याने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी काही ठिकाणी शेतकरी विद्युत पंपाच्या सहाय्याने शेतीला पाणी देत आहेत. टोकण पद्धतीने केलेली भात पेरणीची उगवण लवकर होते परंतु, तीही अर्धवट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार भात पेरणीचे संकट आले आहे. दरम्यान, शिराळा येथे धूळवाफेवर भाताची पेरणी केली जाते. मान्सून केरळमध्ये धडकण्याच्या सुमारे १५ दिवस अगोदर पेरणीचे काम पूर्ण केले जाते. गेल्या कित्येक वर्षात मान्सूनपूर्व पाउस वेळेवर पडत नसल्याने शेतकऱ्यांना भाताची पेरणी करण्याचा अंदाज येत नाही. यंदाही मान्सूनच्या तारखेत सतत बदल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे.
शिराळा पश्चिम भागात दुबार भात पेरणीचे संकट
