शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग
लाखो साई भक्तांना मोठा दिलासा

शिर्डी- साईबाबांच्या शिर्डीला समृद्धी महामार्ग आणि वंदे भारत एक्स्प्रेसशी कनेक्ट केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने शिर्डीतील विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमधून शिर्डीत काकड आरतीसाठी येणाऱ्या लाखो साईभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.नाईट लँडिंगमुळे शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजपासून शिर्डीत विमानांचे नाईट लँडिंग सुरू झाले आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आज इंडिगो कंपनीचे विमान रात्री आठ वाजता शिर्डी विमानतळावर उतरले.आता हळूहळू नाईट लँडिंग करणाऱ्या विमानांची संख्या वाढवण्यात येणार आहे.साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांमध्ये हैदराबाद, चेन्नई,दिल्ली आणि बंगळुरू येथील प्रवाशांची संख्या मोठी आहे.परंतु साईबाबा मंदिरात काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील भाविकांना शिर्डीत मुक्काम करावा लागत होता.परंतु आता विमानांच्या नाईट लँडिंगमुळे राज्याबाहेरील प्रवाशांना काकड आरती करत तातडीने विमानाने परतणे शक्य होणार आहे.शिर्डीत विमानाची सोय उपलब्ध झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सोय करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे आता केंद्राच्या या निर्णयामुळे भाविकांना शिर्डीत पोहचणे आणि परतणे सुलभ होणार आहे. यापूर्वी शिर्डी विमानतळावरील विमानांच्या धावपट्ट्यांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता नाईट लँडिंगची व्यवस्था झाल्यामुळे साईभक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Scroll to Top