ठाणे – शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना ९ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
घरगुती वाद झाल्याने रागाच्या भरात विवाहित महिला घरातून निघून गेली होती. रात्रीच्या वेळी मंदिरात थांबलेल्या ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. विवाहितेची हत्या करणाऱ्या तिघा नराधमांना डायघर पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्या.
महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून नवी मुंबई आणि कोपरखैराणे येथे निदर्शने करण्यात आली. आरोपींना फाशीची शिक्षा करून पीडित महिलेला न्याय द्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.