शिवकालीन समुद्री आरमाराचे
८ आणि ९ एप्रिल रोजी प्रदर्शन

मुंबई
छत्रपती शिवरायांच्या सागरी राजधानी, सिंधुदुर्ग आणि तिहेरी तटबंदीने वेष्टित अजेय विजयदुर्ग या दोन जलदुर्गांच्या प्रमाणबध्द प्रतिकृतींचे प्रदर्शन मुंबईत होत आहे. ८ आणि ९ एप्रिल रोजी साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले पूर्व येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे दोनदिवसीय प्रदर्शन खुले असणार आहे. विशेष म्हणजे हे प्रदर्शन सर्वांसाठी निःशुल्क असणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष, ऋषिकेश यादव यांच्या हस्ते होणार आहे. कोकणच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रजेचे आणि व्यापारी हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी १६५६ -५७ या कालखंडात मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. \’ज्याचे आरमार त्याचा समुद्र\’ हे सूत्र ओळखणाऱ्या शिवरायांची दूरदृष्टी आजच्या पिढीला समजावी, या हेतूने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अतिशय उत्कृष्ट, प्रमाणबद्धता, सुबकपणा, बारकावे आणि उत्तम प्रकाशयोजनेमुळे या दोन्ही किल्ल्यांच्या प्रतिकृती \’बर्ड आय व्ह्यू\’ चा उत्तम अनुभव देणार आहेत. महासंघाने जास्तीत जास्त इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींना या प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top