मुंबई – विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचारसभा घेण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस लागली आहे.१७ नोव्हेंबर रोजी म्हणजे प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गट , शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि मनसे या चार पक्षांनी अर्ज केले आहेत.सर्वात आधी मनसेने अर्ज केल्याने त्यांनाच प्राधान्य दिले जाईल,अशी शक्यता आहे.
निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे.येथे सभा घेण्यासाठी प्रत्येक पक्ष उत्सुक असतात.
विधानसभेचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी थांबणार आहे. त्याआधी एक दिवस म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेला खूप महत्त्व आहे.परंतु एकाच दिवशी चार चार राजकीय पक्षांनी परवानगीसाठी अर्ज केल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.
