मुंबई – जागतिक भांडवली बाजारातील दमदार संकेत, बँका आयटी क्षेत्रातील शेअरच्या किमतीतील वाढीमुळे आज भारतीय भांडवली बाजारात तेजी दिसून आली.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात १ हजार ३३० अंकांनी वाढून ८० हजार ४३६ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ३९७ अंकांच्या वाढीसह पुन्हा २४ हजार ५४१ चा टप्पा गाठला. सेन्सेक्स आणि निफ्टीतील आजची ही वाढ प्रत्येकी १.६ टक्के राहिली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांची ७.१७ लाख कोटी रुपयांची कमाई झाली.गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या हिंडेनबर्गच्या दुसऱ्या अहवालानंतर देशातील भांडवली बाजारात मोठी पडझड होईल,अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.अदानी उद्योग समुह आणि सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या हिंडेनबर्ग अहवालाने भांडवली बाजारावर फारसा परिणाम झाला नाही.गेल्या शनिवारी हिंडेनबर्गचा हा दुसरा अहवाल प्रसिध्द झाला होता. त्यानंतर सोमवारी बाजारात काही प्रमाणात घसरण झाली. पण नंतर बाजार सावरला. आज तर सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात १ हजार अंकांची उसळी घेतली होती. तर निफ्टी २५ हजारावर पोहोचला.निफ्टीचे ऑटो, आयटी, मेटल, मीडिया आणि ऑईल अँड गॅस या निर्देशांकांमध्ये आज वाढ दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअरही बऱ्यापैकी वधारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३० कंपन्यांवर आधारित आहे. या ३० पैकी २८ कंपन्यांमध्ये आज वाढ झाली.महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टील या कंपन्यांमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.
