नांदेड – संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेले असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस पार्टीने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या सभेची लगीन घाई सुरू केली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची पुढील रविवारी म्हणजेच २६ मार्च रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी लोहा येथील सभास्थळी नारळ फोडून त्या जागेचे भूमिपूजन आज करण्यात आले.
एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला आहे. मागील दोन दिवसापासुन गारपीट , वादळामुळे शेतातील रब्बी पिकांसह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतांना विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांसह,सत्ताधारी असलेले खासदार,आमदार हे देखील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात गुतंतले आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असताना दुसरीकडे स्वतः ला शेतकऱ्यांचा पक्ष म्हणवुन घेणाऱ्या बी आर एस पार्टीने नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणुन घेणारे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे हे भारत राष्ट्र समितीची सभा आयोजित करण्यासाठी धडपडत असल्याचे पहायला मिळत आहे . एकीकडे शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करायचे आणि शेतकरी मोठ्या अडचणीत असताना त्याच्या दुःखावर फुंकर घालने आवश्यक असताना आपल्या स्वार्थासाठी त्याला वाऱ्यावर सोडायचे , किती हा विरोधाभास म्हणायचा असा सवाल संकटात सापडलेले हजारो शेतकरी करत आहेत. स्वार्थी राजकारणी वेळ आली की स्वतःला शेतकरी पुत्र संबोधुन घ्यायचे आणि शेतकरी संकटात असताना बाजुला पळायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण मात्र करीत रहायचे, अशी भूमिका भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस पार्टीने घेतली आहे.
मागील दोन दिवसापासुन नांदेड जिल्ह्यातीलअर्धापुर,मुदखेड,लोहा, मुखेड तालुक्यातील हजारो एकर शेतीवरील पिकांना गारपीट आणी पावसाने झोडपुन काढले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. घरात असलेल्या शेतमालालाही योग्य भाव नाही. त्यातच आलेले हे आस्मानी संकट यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेले आहेत. असे असताना अनेक नेते,आमदार,खासदार सामाजिक संघटना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणुन प्रयन्त करत आहेत. पण अशा परिस्थिती लोहा येथे भारत राष्ट्र समितीची भव्य सभा आयोजित करण्यासाठी बी आर एस पार्टी कामाला लागली आहे. त्याचा सर्वत्र सोशल मिडियातुन गाजावाजा होताना दिसुन येत आहे . बिआरएस हि शेतकरी हितासाठीच कार्य करीत असल्याचे या पक्षाकडून सांगण्यात येते. त्यांचा नाराच \’अब की बार किसान सरकार\’, असा आहे. शेतकऱ्यांना सुखी करण्याचे या पक्षाचे धोरण असल्याचे सांगण्यात येते . परंतु संपुर्ण नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले असताना या पक्षातील तेलंगणातून आलेल्या एकातरी नेत्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करुन दिलासा दिला आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे शेतकरी आमच्यासाठी महत्वाचा म्हणायचे आणी तो अडचणीत असताना त्यांना वाऱ्यावर सोडुन आपल्या स्वार्थासाठी राजकारण करायचे असे विरोधाभासी चित्र सध्या नांदेड जिल्ह्यात दिसुन येत आहे . त्यामुळे शेतकरी यातुन काय बोध घेतील तो येणारा काळच ठरवणार आहे.