नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत यश मिळविण्यासाठी आजपासूनच राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. आज नाशिकच्या दिंडोरी येथे पहिल्याच दिवशी त्यांनी खळबळजनक घोषणा केली. ते जाहीर सभेत म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकर्यांना आता वीजबील भरावे लागणार नाही. इतकेच नव्हे तर जर थकबाकी असेल तर तीही भरण्याची गरज नाही. वीज जोडणी कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला माझे नाव सांगा. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. यापूर्वी शेतकर्यांनी वीजबील भरण्यास नकार दिल्यानंतर प्रचंड थकबाकी निर्माण होऊन वीजपुरवठा प्रक्रियेत अडचण येऊन वीज कर्मचार्यांचे पगार करण्यासही पैसे उरले नव्हते. हा अनुभव पाठीशी असताना अजित पवारांनी सौरऊर्जा पंपाच्या जोरावर शून्य वीज बिलाची घोषणा करताना थकबाकीही भरू नका, असे बेधडक सांगितले आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अजित पवारांनी राजकारण सुरू केले असले तरी भविष्यात महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीला याचा मोठा फटका बसणार आहे.
आजपासून अजित पवार यांच्या पक्षाची नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली. त्यांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या यात्रेत पाच दिवसांत दोन विधानसभा मतदारसंघात यात्रा जाणार आहे आणि दोन दिवस अजित पवार मुंबईत थांबणार आहेत. निवडणुका संपेपर्यंत त्यांची ही यात्रा सुरू राहणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा झाली, यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या यात्रेचे नाव जनसन्मान ठेवले. कारण तुम्ही यावर्षीचा अर्थसंकल्प पाहिला असेल त्यात महिला, शेतकरी, मुलींचे शिक्षण, सामान्य जनतेचा विचार केला होता. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, आम्ही राजे नाही तर जनतेचे सेवक आहोत. 33 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. शेतकर्यांना मदत केली आहे. माझ्या शेतकर्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते. त्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकर्यांना त्याचा फायदा मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांना आता शेतीचे वीजबिल भरावे लागणार नाही. एवढेच नव्हे तर आतापर्यंत थकबाकी असलेले बिल भरण्याची गरज नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला सांगा अजितदादाने सांगितले आहे. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकर्यांना विजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही.
सौरऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकर्यांना मिळणार आहे.
मी 10 वर्षे राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे, मी 10 अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करून योजनेला पैसे देता येतात, हे मला माहिती आहे. अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान- सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक म्हणतात की, लाडकी बहीण योजना औटघटकेची आहे. मात्र, पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहील, हा अजितदादाचा वादा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. घाबरु नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे. महिलांना त्यांचा हक्क मिळेल. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. आमचा प्रयत्न आहे की, 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यातच जमा करावेत. आतापर्यंत सव्वा कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, 17 तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो. ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
या पैशातून तुमच्या स्वत:साठी काहीतरी घ्या. लाडक्या बहिणींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला उठाव मिळेल. 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या माझ्या माता भगिनींची निवडणूक आहे. या निवडणुकीत कोणाला आणायचे, कोणाला नाही आणायचे हे यासाठी पुरुषांचे काम तर आहेच. परंतु माय माऊलींचे काम महत्त्वाचे आहे. राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळाले नाही, अशी ओरड सुरू केली. मात्र, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरू केली आहे. दिंडोरीनंतर देवळाली, धुळे, नगर असा अजित पवारांचा पहिला दौरा राहणार आहे.
गोकुळ झिरवाळांची दादांच्या
’जनसन्मान’ कडे पाठ
नाशिक – अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेकडे आमदार नरहरी झिरवाळ यांचा पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी पाठ फिरवली. गोकुळ यांनी जनसन्मान यात्रेला दांडी मारल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकारणात चर्चा रंगली आहे. यावर गोकुळ झिरवाळ म्हणाले की, माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांच्याकडे बघून झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करत आहे. मी लोकसभा निवडणूक देखील लढण्यास इच्छुक होतो. मी महाविकास आघाडीत असून, शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीत आहे. माझी छाती फाडली, तर शरद पवार दिसतील. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय आणि करत राहणार. शरद पवार साहेबांनी आदेश दिल्यास वडिलांच्या विरोधात लढण्यास तयार आहे.