बुलढाणा :
बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील कोथळी येथील सरोदे शेतकरी कुटुंबीयांनी मुलीच्या लग्न सोहळ्याला आगळेवेगळे स्वरूप दिले. चार एकरात किल्लेदार मंडप टाकून मुलीचा विवाह मोठ्या धडाक्यात पार पडला. विशेष म्हणजे, १० हजार लोकांना गाव पंगत देत, गावातील गुरांसाठी कुटार, ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखरेचा बेत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या लग्नाची चर्चा जिल्हाभर झाली.
कोथळी येथील शेतकरी प्रकाश सरोदे यांच्या पूजा नावाच्या मुलीचा विवाह अतुल रमेश दिवाने यांच्याशी काल ७ मे रोजी मोठ्या उत्साहात कोथळी येथे विवाह संपन्न झाला. शेतकरी असलो तरी, मुलीचा शाही विवाह करू असे सरोदे यांचे स्वप्न होते. मुलीच्या लग्नात गावातील जनावरेही उपाशी राहणार नाही, असा संकल्प देखील त्यांनी केला होता. त्यामुळे प्रकाश सरोदे यांनी मुलीच्या विवाहासाठी चार एकर जागेत किल्लेदार मंडप उभारला होता. पंचक्रोशीतील गावातील सर्वधर्मीय लोकांना जेवणासाठी चुलबंद आवतण देण्यात आले होते. शिवाय, लग्नात आहेर पद्धत बंद होती. विशेष म्हणजे गावातील गुराढोरांना ३ ट्रॉली कुटार, १० क्विंटल ढेप, कुत्र्यांसाठी पोळ्या, मुंग्यांना साखर असा जेवणाचा बेत आखला होता. लग्न सोहळ्यात गाव जेवण हे ठरलेलेच असते. परंतु गावातील जनावरांनादेखील पंगत दिल्याने या विवाह सोहळ्याला मुक्या प्राण्यांची सुद्धा उपस्थिती होती.