शेतातील वीज तारेचा शॉक लागून दाम्पत्यांचा मृत्यू!

यवतमाळ – शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी कुंपणाच्या तारेत सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा धक्का लागून एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.काल पहाटेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. पती-पत्नी एकाच जागी मृतावस्थेत आढळून आले. आनंदा शंकर कोरंगे (४०), अनिता आनंदा कोरंगे (३५) दोघे रा.रातचांदणा अशी मृत दाम्पत्याचे नाव आहे.

कोरंगे दाम्पत्याची मुले यवतमाळातील वसतिगृहात शिकायला आहेत. हे दाम्पत्य पूर्णवेळ शेतात वास्तव्याला होते. त्यांनी यंदा कपाशीचे पीक लावले होते. परिसरात रानडुकरांचा प्रचंड उपद्रव आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आनंदा कोरंगे यांनी शेताला चारही बाजूने तारेचे कुंपण करून त्यात वीज प्रवाह सोडला. काल कोरंगे दाम्पत्य शेतात फेरफटका मारत असताना त्यांचा जिवंत वीज तारेशी संपर्क आला. यावेळी पत्नी अनिताने पतीला वाचविण्याच प्रयत्न केला.मात्र दोघांनाही शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.