नवी मुंबई – महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांची संख्या 13 वर पोहोचली असून, दोन श्रीसदस्यांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एमजीएम रुग्णालयात धाव घेत अत्यवस्थ श्रीसेवकांची विचारपूस केली. राज ठाकरेंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा सोहळा भरउन्हात का घेतला, असा जाब शिंदे-फडणवीस सरकारला विचारत हल्लाबोल केला. दरम्यान, ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींनी व्यक्त केली.
खारघरमध्ये रविवारी लाखो श्रीसदस्यांच्या जनसागरासमोर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्याच्या वेळी जमलेल्या सुमारे 3 लाखांवर श्रीसदस्यांच्या समुदायातील 18 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मृतांचा सरकारी अधिकृत आकडा 13 वर पोहोचला आहे. 82 श्रीसदस्य अजूनही उष्माघाताने अत्यवस्थ आहेत. यातील काही नागरिक चेंगचेंगरीनेही जखमी झालेत. या सर्वांवर कामोठे येथे एमजीएम, नवी मुंबईतील टाटा रुग्णालय आणि डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र दबावामुळे आणि भीतीमुळे रुग्णालयातील कोणीच कर्मचारी काही बोलायला तयार नाहीत. कुणी मोबाईलने फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर सुरक्षा रक्षक थांबवत असल्याचे चित्र होते.
उष्माघात आणि तापमानावर रोज बोलणारे अधिकारी आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंध असलेल्या सनदी अधिकार्यांनी फोन उचलणे, माहिती देणे बंद केले होते. रुग्णांनी सांगितले की, आमच्या पोटात काही नव्हते. काहींनी सांगितले की, आम्ही फक्त फळे खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्रता खूप होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली, असे काहीजण सांगत होते. काहींना दवाखान्यात आणल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य कळले. मुख्य मैदानाला जोडून आणखी दोन मैदाने घेण्यात आली होती. त्यात सेंटर स्टेज, जिथे अति महत्वाच्या व्यक्ती होत्या तिथल्या स्टेजवर वातानुकूलित यंत्रणा होती, तर बाजूच्या स्टेजवर देखील ही यंत्रणा होती. मात्र सामान्य जनता पूर्ण वेळ उन्हात होती, तिथे पाण्याच्या सिन्टेक्सच्या छोट्या टाक्या लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या स्टेजजवळ होत्या. त्यामुळे तिथे पोहोचता येत नव्हते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आपले दु:ख व्यक्त केले. त्यात ते म्हणाले की, काल सोहळ्यात अनेक श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात काही श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. ही घटना खूप दुर्दैवी आणि क्लेशदायी आहे. हे माझ्या कुटुंबावर आलेले संकट आहे. माझ्याकडे दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. या घटनेवरून कोणीही राजकारण करू नये. दरम्यान, खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘आप्पासाहेबांवर टीका करायची नाही, पण जे घडले ते दु:खद आहे. राज्य सरकारने हा कार्यक्रम आयोजित करताना विचार करायला हवा होता. व्यासपीठावर राजकीय मंच सजला होता. राजकारण्यांनी त्यांचा अंत पाहिला. आज दुपारी राज ठाकरे स्वत: एमजीएम रुग्णालयात पोहोचले आणि श्रीसदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, ‘ही घटना कोणीही जाणीवपूर्वक केलेली नाही. पण तरीही एवढ्या लोकांना न बोलावता राजभवनावरच दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम झाला असता तर असा प्रसंगच ओढावला नसता. राजकीय स्वार्थासाठी एवढे लोक बोलावले गेले. अंबादास दानवेंनी कामोठे येथील एमजीएम आणि खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. अंबादास दानवेंनी सांगितले की, खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेला सर्वस्वी सांस्कृतिक विभाग जबाबदार आहे. सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सांस्कृतिक विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असे दाखवायचे हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होते.’ उदय सामंत म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून खारघरला मी स्वत: या कार्यक्रमाचा आढावा घेत होतो. त्यावेळी तापमान कमी होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अचानक तापमान वाढले. कार्यक्रमाच्या दिवशी तेथे आम्ही पाण्याची व्यवस्था केली होती. वैद्यकीय सेवा तेथे मोठ्या प्रमाणात सज्ज केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीसदस्यांशी चर्चा करूनच केले होते. या घटनेवरून कोणी राजकारण करू नये, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे.
सविताच्या आईने टाहो फोडला
सोलापूरच्या मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता पवार यादेखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. त्यांचा या कार्यक्रमावेळी उष्माघाताने मृत्यू झाला. सविता यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी मंगळवेढा येथे आणण्यात आला. सविता यांचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी टाहो फोडला. त्यांच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून
टाकणारा होता.
सोहळा संध्याकाळी का नाही?
राज ठाकरेंनी विचारला जाब
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेसंबंधी ट्विट केले. त्यांनी लिहिले, ‘काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचे आणि सरकारचे अभिनंदन केले होते. या सोहळ्याला जे गालबोट लागले ते टाळता आले नसते का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळले नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
श्रीसदस्य मृतांची संख्या 13 वर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
