*प्रकल्पाचा सुधारित खर्च १४ हजार कोटींपर्यंत !
मुंबई – ठाणे ते बोरिवली हे अंतर आता अवघ्या १५ मिनिटांत पार करण्यासाठी संजय गांधी उद्यानात जमिनीखालून दुहेरी बोगदे बनवले जाणार आहे.या प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट अखेर एलअॅण्डटी म्हणजेच लार्सन अँड टुब्रो आणि एमआयएआयएल अर्थात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या दोन कंपन्यांना मिळाले आहे.या बोगदा प्रकल्पाच्या बांधकामासाठी ११.८४ किमीच्या प्रत्येकी एका पॅकेजसाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले आहे.
एमएमआरडीएच्या या रस्ता प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत २३.६८ किमी लांबीचे रस्ते बोगदे आणि दोन्ही टोकांना एकत्रित १ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत.प्रत्येकी ३ लेन असलेले बोगदे ४ मेगा टनेल बोरिंग मशीनवापरून पृष्ठभागाखाली जास्तीत जास्त २३ मीटर खोलीवर बांधले जातील आणि बोरिवलीतील मागाठाणेचे एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी यांना जोडले जातील.या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ११२३५ कोटी रुपये इतका असून आता सुधारित खर्च म्हणून १४००० कोटी रुपये असे नमूद करण्यात करण्यात आले आहे.