संजीव खन्ना देशाचे ५१वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली – न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सकाळी दहा वाजता देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. यावेळी मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिने असून, १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होणार आहेत. संजीव खन्ना यांची जानेवारी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. सेवा ज्येष्ठतेनुसार २४ ऑक्टोबर रोजी तत्कालिन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती.