मुंबई :- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या संपाचा सर्वात मोठा फटका रुग्णसेवेला बसत आहे. रुग्णालयामध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अनेक कामांचा भार वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, निवासी डॉक्टरांवर पडला. मात्र वैद्यकीय सेवा देताना इतर कामांचाही भार पेलावा लागत असल्याने डॉक्टरांची दमछाक होत असल्याचे चित्र दिसले. शिवाय राज्यातील सरकारी कार्यलये ओस पडलेली होती. संपाच्या पहिल्या दिवसापासून सर्व रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र आज पाचव्या दिवशी शस्त्रक्रियांवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. जे.जे. रुग्णालयात गुरुवारी अवघ्या १६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर जी. टी आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयांमध्ये बहुतांश शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. नागपुरात शासकीय वैद्यकीय रूग्णालयात शुकशुकाट होता. कर्मचारी, तंत्रज्ञ, परिचारिका संपामुळे आलेच नाहीत. त्यामुळे रूग्णसेवा कोलमडली आहे. अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.