नवी दिल्ली – काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज संविधान प्रत हाती घेवून, लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून त्या सभागृहात दाखल झाल्या होत्या. प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या असून संसदेतील गांधी घराण्यातील त्या तिसऱ्या संसद सदस्या ठरल्या आहेत. त्यांची आई सोनिया गांधी या राजस्थानमधून पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. तर भाऊ राहुल गांधी रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी प्रियंका गांधी यांनी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासह संसद भवनात प्रवेश केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर प्रियंका गांधी यांना थांबवून एक फोटो काढला. प्रियंका गांधी यांचा शपथविधी पाहण्यासाठी त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया उपस्थित होते.
