नवी दिल्ली – संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोदी यांनी पन्नास मिनिटे भाषण करून संसदेचा 75 वर्षांचा प्रवास कथन केला. यात त्यांनी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग या काँग्रेस पंतप्रधानांचा उल्लेख केला. मोदी यांचे भाषण संपल्यावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी भाषणाला उभे राहिले. मात्र, मोदी स्वतःचे भाषण संपताच सभागृहातून निघून गेले होते.
पंतप्रधान मोदी यांचे आज जुन्या संसद भवनातील सभागृहात भाषण झाले. जुन्या संसदेतील संसदीय कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता. उद्यापासून संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात होणार आहे. यामुळे सर्वच महत्वाच्या खासदारांना आज आठवणी व्यक्त करायच्या होत्या. मोदी हे संसद कामकाजावेळी नेहमी फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी भाषण करून निघून जातात. इतरांची निवेदने ते ऐकत नाहीत, असा त्यांच्यावर सतत आरोप होतो. आजही तेच झाले. त्यांनी भाषण केले आणि इतरांचे भाषण ऐकण्यासाठी न थांबता ते निघून गेले. ते निघून गेल्याचे पाहून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. मात्र ते गेलेले नाहीत, त्यांची बॅग इथे आहे, ते परत येतील असे सांगण्यात आले. पण मोदी पुन्हा सभागृहात आलेच नाहीत.
विशेष अधिवेशनासाठी आज मोदी 10.45 वाजता जुन्या संसद भवनात गेले. संपूर्ण संसद भवन खासदारांनी भरले होते. सुरुवातीला विरोधकांनी तांत्रिक बाबींवरून गोंधळ घातला. सभापतींनी त्यांना शांत केल्यानंतर मोदींनी संसद भवनाला संबोधित केले. मोदी यांनी आपल्या भाषणात जुन्या संसदेच्या इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी अनेक प्रसंग सांगितले आणि माजी पंतप्रधानांचे आणि काही नेत्यांचे स्मरण केले. मोदी म्हणाले की, या सदनात पंडित नेहरूंच्या ‘स्ट्रोक ऑफ मिडनाइट’चा प्रतिध्वनी आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. या सदनाने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील बांगलादेश मुक्तिसंग्रामाची चळवळ पाहिली. याच सदनाने कलम 370 काढून टाकल्याचेही पाहिले आहे. लालबहादूर शास्त्री यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा अनेकांनी या सभागृहाचे नेतृत्व केले. सभागृहाच्या माध्यमातून देशाला दिशा दिली. देशाला नवा आकार देण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. आज त्या सर्वांचा गौरव करण्याची संधी आहे. सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया, चंद्रशेखर, अडवाणी अशी असंख्य नावे आहेत, ज्यांनी आपले आपल्या चर्चा समृद्ध केल्या. वन नेशन वन टॅक्स, जीएसटी, वन रँक वन पेन्शन, गरिबांसाठी 10 टक्के आरक्षणही या सभागृहाने दिले आहे. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख मोदींनी केला. ते म्हणाले, हा हल्ला इमारतीवर नव्हता तर आपल्या आत्म्यावर होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. ज्या सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांशी लढताना आपले रक्षण केले त्यांना कधीच विसरता येणार नाही,
या भाषणादरम्यान मोदींनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. हे अधिवेशन लहान असले तरी वेळेच्या दृष्टीने खूप मोठे आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे सत्र आहे. या सत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचा 75 वर्षांचा प्रवास आता एका नव्या ठिकाणाहून सुरू होत आहे. इथपर्यंतचा 75 वर्षांचा प्रवास प्रेरणादायी होता. आता नवा प्रवास, नवीन संकल्प, नव्या आत्मविश्वासाने 2047 पर्यंत देशाला विकसित देश
बनवायचे आहे.
संसदेत जाण्यापूर्वी मोदी यांनी संसदेबाहेर प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, हे सत्र महत्त्वाचे आहे. मी सर्व खासदारांना विनंती करतो की, हे एक लहानसे अधिवेशन असले तरीही खासदारांनी जास्तीत जास्त वेळ कामकाजाला द्यावा. बाकी इतर वेळी रडगाणे गायला वेळ आहेच. त्यामुळे नव्या संसदेत सर्वांनी उत्साहाने, नव्या उमेदीने जायचे जावे. जुन्या वाईट गोष्टींना मागे टाकून नव्या घरात आनंदाने प्रवेश करा. उद्या गणेश चतुर्थीला आपण नवीन संसदेत जात आहोत. श्रीगणेशाला ‘विघ्नहर्ता’ असेही म्हणतात, आता देशाच्या विकासात कोणताही अडथळा येणार नाहीत. भारत आपले सर्व संकल्प कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करेल. संसदेचे हे अधिवेशन लहान असले तरी त्याची व्याप्ती
ऐतिहासिक आहे.
संसदेत भाषण करून पंतप्रधान मोदी निघून गेले
