सप्तश्रृंगगडावर उद्यापासून
चैत्रोत्सव! प्रशासन सज्ज

नाशिक – उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तश्रृंग मातेच्या चैत्रोत्सवास गुरुवार ३० मार्चपासून सुरवात होत आहे. यात्रोत्सव काळात गडावर प्लस्टीक बंदीच्या अंमलबजाणीसह भाविकांच्या वाहतूकीसाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करुन देण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी दिले आहेत. तसेच, न्यासा संस्थातर्फे भाविकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जनसुरक्षा विमा काढण्यात आला असून, पदयात्रेकरुंच्या निवाऱ्यासाठी वॉटरफ्रुप मंडप उभारण्यात येत आहे.

सप्तश्रृंगी गडावर ३० मार्च ते ६ एप्रिलपर्यंत चैत्र यात्रोत्सव होत आहे. यात्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात मंगळवारी २४ मार्चला सप्तश्रृंगी देवी ट्रस्टच्या कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या वेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गत शारदीय नवरात्रोत्सव काळातील अनुभवांच्या पार्श्‍वभूमीवर सुस्थितीत असलेल्या नव्या बसेस, क्रेन, पिण्याचे पाणी आदी उपलब्ध करुन देण्याचे आदेश नरवाडे यांनी दिले. नांदुरी ते सप्तशृंगी गड दरम्यान १०० बसेस, तर नाशिक विभागातून २५० बसेसद्वारे यात्रोत्सव काळात भाविकांची वाहतूक केली जाईल.

Scroll to Top