दिल्ली – भारताच्या संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातो, असा आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर, राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी टीका केली होती. त्यावर आता काँग्रेसही आक्रमक झाली आहे. धनकड यांच्यावर पलटवार करताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की राजसभेचे सभापती हे एक प्रकारे अंपायर आहेत, सत्ताधाऱ्यांचे चिअरलीडर नाहीत! हे त्यांनी ध्यानात ठेवावे.
काही दिवसांपूर्वी परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी, सध्या भारतात कशा प्रकारचे वातावरण आहे. याची तेथील प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती. यावेळी त्यांनी संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातो, त्यांच्या समोरील माईक बंद केले जातात असा आरोप केला होता. राहुल गांधींच्या या आरोपानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड चांगलेच संतापले होते. राहुल गांधींना असा आरोप करण्याची हिम्मतच कशी झाली, असा सवाल करीत देशांतर्गत बाबींविषयी परदेशात जाऊन चुकीची माहिती देणे हा देशाचा अपमान आहे. असे धनकड यांनी म्हटले होते. त्यावर आज जयराम रमेश यांनी जोरदार पलटवार केला.