द्वारका
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौर्यावर होते. त्ययांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेचे स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून हे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान भावूक झाले. त्यांनी दर्शनासाठी जाताना भगवान श्रीकृष्णासाठी मोरपीसही नेले होते. द्वारका येथे त्यांनी प्रार्थना केली.
दर्शन घेतल्यावर ते म्हणाले, मी खूप भावनाविवश, सद्गित झालो असून दशकांपासून या भूमीला स्पर्श करण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले.पाण्याच्या तळाशी असलेल्या द्वारका नगरीचे दर्शन हा माझ्यासाठी अध्यात्मिक आणि शाश्वत भक्तीचा अनुभव होता. एका प्राचीन काळाशी जोडले गेल्याचा अनुभव प्राप्त झाला असून श्रीकृष्णाची कर्मभूमी असलेल्या द्वारकाधामाला मी श्रद्धापूर्वक नमन करत आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद द्यावेत.
आज पंतप्रधानांनी द्वारका ते ओखा यांना जोडणाऱ्या २.३२ किलोमीटर लांबीच्या सुदर्शन सेतूचेही उद्घाटन केले. देशातल्या या सर्वात मोठ्या केबल पुलाची पायाभरणी २०१७ साली पंतप्रधानांनी केली होती. ९०० कोटी रुपये खर्च करुन हा पुल बांधण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या सुदर्शन सेतूच्या पदपथांवर दोन्ही बाजूंना श्रीमद्भगद् गीतेमधील वचने आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा आहेत. या पुलाच्या पदपथाच्या वरच्या भागात एक मेगावॉट वीज निर्माण करणारी सौर पॅनेल्सदेखील बसवण्यात आली आहेत. या पुलामुळे लोकांना आता बोटीचा प्रवास करावा लागणार नाही. या कार्यक्रमाच्या वेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी तीर्थनगरी द्वारका येथे पंतप्रधानांनी द्वारकाधीश मंदिराचाही दौरा केला. तिथे पूजा अर्चा केली. पंतप्रधानांनी या ठिकाणी दानही केले. त्यांनी द्वारिकापीठ शंकराचार्यांचेही दर्शन घेतले व त्यांना पुष्पमाला अर्पण केली. शंकराचार्यांनी पंतप्रधानांना उपरणे व रुद्राक्षाची माळ भेट दिली. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी विविध प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटनही करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी राजकोट येथून ५ एम्स रुग्णालयालांचे लोकार्पण केले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी राजकोटमध्येही विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. राजकोटविषयी त्यांनी आपली जुनी आठवणही आपल्या समाज माध्यमांवर प्रकाशित केली आहे. २२ वर्षांपूर्वी आपण राजकोटमधूनच पहिल्यांदा विजयी होऊन आमदार झालो होतो अशी आठवणही त्यांनी लिहिली आहे. राजकोटच्या रेसकार्सवर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी राजकोटसाठीच्या विविध लोकोपयोगी प्रकल्पांचा शिलान्यास व उद्घाटन केले.