वर्धा : – समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जात असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टर ज्योती क्षीरसागर, डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे आणि भरत क्षीरसागर अशी मृतांची नावे आहेत. फाल्गुनी सुरवाडे आणि ज्योती क्षीरसागर या दोघी मैत्रिणी डेंटिस्ट डॉक्टर आहेत. तसेच या दोघी अगदी जवळच्या मैत्रीणी होत्या. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात ही घटना घडली. रात्री बारा ते एकच्या दरम्यान हा अपघात घडला.
नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. समोरील ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून धडक मारली. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेले अपघात ही चिंतेची बाब ठरलेली आहे.