समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच

मुंबई

नागपूर आणि मुंबईला वेगाने जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा ८० किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा २६ मे रोजी खुला होणार आहे. या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी ३ वाजता होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यासाठी जंगी तयारी सुरू केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर भरवीर ते नागपूर अंतर सहा तासांत पार करणे शक्य होणार आहे. समृद्धीचा तिसरा टप्पा हा भरवीर ते भिवंडी असा आहे. संपूर्ण महामार्ग हा जुलै २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्याचे काम अजून बाकी असल्याने संपूर्ण महामार्ग खुला होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा महामार्ग भारतातील पहिला हाय स्पीड हायवे असून हा महामार्ग सहा पदरी असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top