समृद्धी महामार्गावरील
नागपूर-शिर्डी बससेवा स्थगित

नागपूर: समृद्धी महामार्गावरून सुरू करण्यात आलेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या एसटीचा खर्चही प्रवाशांअभावी निघत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. डिझेलचे पैसेही निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समृद्धी महामार्गावरून धावणारी नागपूर- शिर्डी बस सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरू केली होती. तेराशे रुपये भाडे असलेल्या या सेवेच्या माध्यमातून आठ तासात शिर्डीला पोहोचता येत असल्याने या बस सेवेला मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यातच समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद करण्याची नामुष्की एसटीवर ओढावली आहे.

नागपूर ते शिर्डी या बस सेवेला डिसेंबर महिन्यात 40.98 टक्के प्रवासी मिळाले होते. मात्र, जानेवारी महिन्यात या संख्थेत घट होऊन आसन क्षमतेच्या तुलनेत फक्त 13.51 टक्के प्रवासी मिळाले. फेब्रुवारी महिन्यात हा दर 8.58 टक्क्यांवर आला आहे. फेब्रुवारी महिन्यात तर अनेक दिवस एक ही प्रवाशाने या बसने प्रवास केला नाही. त्यामुळेच आता ही बस सेवा बंद ठेवण्याची वेळ एसटीच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.

Scroll to Top