वाशीम -अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करतांना भारतीय सैन्यातील जवान अमोल गोरे यांना वीरमरण आले. सहकारी जवानांना वाचवण्यासाठी अमोल यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला. ही घटना सोमवारी घडली. जवान अमोल यांचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले असून आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमोल गोरे आणि त्यांचे दोन सहकारी जवान चीन सीमेवर गस्तीला असतांना कमेंग व्हॅली येथे वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्यांचे दोन सहकारी वाहून जात असताना अमोल यांनी जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमोल यांच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील मोठा दगड लागला आणि त्यातच ते शहीद झाले. आपल्या दोन सहकारी जवानांना वाचवण्यात अमोल यांना यश आले.
सहकारी जवानांना वाचवताना वाशिमच्या जवानाला वीरमरण
