सहकारी बँकांना आरबीआयचा दणका! चार बँकांना चार लाखांचा दंड ठोठावला

मुंबई- सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची कडक कारवाई सुरूच आहे. नुकतेच आरबीआयने चार सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे.आरबीआय ने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या चार सहकारी बँकांना एकूण चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या चारपैकी तीन बँका महाराष्ट्रातील आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अंदरसुल या बँकेवर १.५० लाख रुपयांचा, तर लातूर जिल्ह्यातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, अहमदपूर, या बँकेवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेडला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या तिन्ही बँकांनी, संचालक मंडळाची भूमिका आणि नागरी सहकारी बँकांना लागू होणाऱ्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंडाला सामोरे जावे लागल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. कारवाई झालेली चौथी बँक मध्य प्रदेशातील असून, ‘केवायसी’संबंधी निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ‘जिला सहकारी केंद्रीय बँक मर्यादित, शहाडोल’वर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड नियम पालन न केल्यामुळे मध्यवर्ती बँकेने चार स्वतंत्र नोटिसांद्वारे स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top