सांगली :
पुणे-लोंढा दुहेरी मार्गाच्या प्रकल्पातंर्गत सांगली रेल्वे स्टेशनवर दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म मंजूर करण्यात आले होते. मात्र सांगलीत अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधले नाहीत. या विरोधात नागरिक जागृती मंचने आवाज उठवल्यानंतर सांगली रेल्वे स्टेशन येथील नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू होणार असून ऑक्टोबर २०२३ पर्यंत हे पूर्ण होईल, असे पत्र नागरिक जागृती मंचला रेल्वे विभागाने दिले आहे.
पुणे-लोंढा ५,००० कोटींच्या रेल्वे दुहेरी प्रकल्पातंर्गत सांगली रेल्वे स्टेशन येथे प्रवासी गाड्यांसाठी दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात भिलवडी, ताकारी, शेनोली, भवानीनगरसारख्या इतर रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले. पण महापालिका व जिल्हा मुख्यालय असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधण्यात आले नाहीत. प्लॅटफॉर्म न बांधताच दुसरी मेन रेल्वे लाईन सुरू करण्यात आली. तसेच रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील सुरू करण्यात आली. याविरोधात नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. सांगली जिल्हा नागरी जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करून सांगलीच्या प्लॅटफॉर्मची मागणी केली होती. त्यांना रेल्वे विभागाने पत्र पाठविले पाठवून सांगली रेल्वे स्टेशन येथील नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू होणार असून ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.
नवीन प्लॅटफॉर्ममुळे प्रामुख्याने कोल्हापूर ते सांगली व सांगली ते कोल्हापूर लोकल रेल्वे गाड्या आता त्वरित सुरू होऊ शकतील. तसेच सांगली ते बेळगाव, सांगली ते हुबळी, सांगली ते लातूर व सांगली ते पंढरपूर या गाड्यादेखील सुरू होऊ शकतील.