नवी दिल्ली – भारताचे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन अर्धवट सोडून कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आपल्या नोकरीत परतले आहेत. आम्ही नोकरीत परतलो, तरी ब्रजभूषणांना आमचा विरोध कायम राहणार असल्याचे साक्षी मलिकने ट्विट करुन सांगितले .तिन्ही कुस्तीपटू रेल्वेमध्ये नोकरी करतात. साक्षी मलिक म्हणाली,‘माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. सत्याच्या लढाईतून आम्ही माघार घेतली नाही आणि घेणारही नाही. सत्याग्रहासोबत रेल्वेतील जबाबदारीही निभावणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरू राहणार आहे.`
शनिवारी रात्री साक्षी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांनी आपल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला होता.
अल्पवयीन कुस्तीपटूने जबाब मागे घेतला. अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण यांच्यावर वाईट हेतूने स्पर्श करणे व टी-शर्ट काढायला लावण्यासारखे गंभीर आरोप केले होते. तिने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. त्यानंतर तिला पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले. तिथे तिने आपला जबाब मागे घेतला.