हवाना – क्युबाच्या दक्षिणेला काल सकाळी एकापोठोपाठ एक असे दोन शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपांची तीव्रती ५.९ व ६.८ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपामुळे काही घरे व इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या भूकंपात जिवीतहानी झाली नसली तरी चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पाठोपाठ आलेल्या या भूकंपाने क्युबाचे मोठे नुकसान झाले आहे.क्युबाच्या दक्षिणेकडील अनेक शहरात मोठी पडझड झाली आहे. क्युबाच्या बायामो, सँटियागो जे क्युबा व कॅमी डे लास मर्सिडीस या शहरात मोठी पडझड झाली आहे. या पाठोपाठ त्सुनामीचाही इशारा देण्यात आला होता मात्र त्सुनामीचा धोका टळला आहे. या भूकंपाने शहरातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून वीजेच खांब उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठाही खंडीत झाला. क्युबाच्या या भागात दोन दिवसांपूर्वीच राफेल व ऑस्कर अशी दोन चक्रीवादळे आली होती. वीजपुरवठा बंद झाल्याने क्युबात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. काल सकाळी अकरा वाजता अचानक आलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने लोक तातडीने घराबाहेर पडले.
