नवी मुंबई : पावसामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असताना आज सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पहाटे केमीकल चा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. टँकर पलटी झाल्याने रसत्यावर टँकरमधील पसरलेल्या केमीकलमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
शुक्रवारी पहाटे हायड्रॉलिक केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. बेलापूर अग्निशमन दलाच्या वाहनांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी धूर झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर रोडच्या मध्येच कलंडल्याने सकाळी महामार्गावरवाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली. तुर्भे पुलावर देखील अपघात झाल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी झाली होती. सकाळीच वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.