मुंबई – मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले प्रसिद्ध सायन रुग्णालय आता कात टाकणार आहे. या रुग्णालयाचा पुनर्विका स करण्याची मोहीम पालिका हाती घेतली आहे. याचा पहिला टप्पा पूर्णही झाला असून आता या रुग्णालयाचा कायापालट करण्याच्या दुसर्या टप्प्याच्या कामाला महाराष्ट्र राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे आता या रूग्णालयात आणखी अद्यावत सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे वास्तुशास्त्रज्ञ दुर्गेश पालकर यांनी दिली.
वास्तुशास्त्रज्ञ दुर्गेश पालकर म्हणाले की, या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याचे काम दोन टप्प्यांत होत असून पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून आता दुसरा टप्पा सुरू होईल. या संपूर्ण कामासाठी २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात नर्सिंग कॉलेज तळ, २० बरॅक प्लॉटवर दोन निवासी टॉवर अधिक २० मजली व तळ अधिक २४ मजली इमारत असणार आहे. तर दुसर्या टप्प्यात रुग्णालय इमारत तळ अधिक ११ मजली इमारत बांधली जाणार आहे.
विशेष पहिल्या टप्प्यातील मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले असून १२०० विद्यार्थ्यांसाठी अंडर ग्रॅज्युएट होस्टेल इमारत तयार झाली आहे. तर उर्वरित दोन टप्प्याचे काम सुरू केले आहे. पुढील दोन वर्षात पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय सर्व अद्यावत सोयीसुविधांनी सज्ज असलेले आपणास दिसेल असा आशावाद वास्तुशास्त्रज्ञ दुर्गेश पालकर यांनी व्यक्त केला.