गोवा
होंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सालेली गावातील पाणीपूरवठा गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. नियमित पाणापूरवठा होत नसल्याने गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गणेश चतूर्थीला अवघे काहीच दिवस बाकी असताना गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सालेली व भुईपाल भागातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे भुईपाल येथील वनखात्याच्या चेकपोस्टजवळ पाणीपुरवठा नियंत्रण प्रकल्प उभारून सदर गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे.
दाबोस वाळपई तसेच भुईपाल या भागातील पाणी पुरवठा केंद्रात वारंवार बिघाड होत असल्याने येथील नागरिकांना सतत पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने वारंवार फुटत आहेत. तसेच भुईपालमधील जलप्रवाह केंद्रासाठी असलेली वीजपुरवठा यंत्रणा फार जुनी झाली आहे. त्यामुळे तेथे दररोज वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराक लक्ष घालून ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.