सावरकरांवरील टीका खपवून घेणार नाही
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधी यांना इशारा

मालेगाव – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगावच्या जाहीर सभेत आज उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे भाषण करताना भाजपा आणि शिंदे गटाबरोबरच राहुल गांधींनाही खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले की, आपण देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण त्याचबरोबर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. आपला जो लढा सुरू आहे त्याला फाटे फुटू देऊ नका, असा इशाराच त्यांनी राहुल गांधींना
दिला आहे.
आज मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी तिळमात्र संबंध नाही ते देश गिळायला निघाले आहेत आणि म्हणूनच तुमच्या शक्तीच्या जोरावर मी लढायला निघालो आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे. कारण 2024 मध्ये भाजपा सत्तेत आली तर ही निवडणूक देशासाठी अखेरची ठरेल. तत्पूर्वी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले की, येथे कांद्याला भाव नाही असे सांगितले जाते. पण मी म्हणतो कांद्याला भाव आहे. कारण येथे एक कांदा 50 खोक्यांना विकला गेला आहे. येथील एका शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले, पण ते वाचायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. शेतकर्‍यांना केवळ हमीभाव नको तर हमखास भाव हवा आहे. आमचे सरकार असताना आम्ही वेळेवर शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देत होतो. पण आता अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे अजून पंचनामे झालेले नाही.
आमच्या सरकारच्या काळात ‘जे विकेल तेच पिकेल’ असे धोरण राबविणार होतो. आमच्या सरकारच्या काळात आम्ही खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिलो. पण आताचे कृषीमंत्री अंधारात शेतीची पाहणी करतायत. जणू काही त्यांना दिव्यदृष्टी आहे. मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोद्योग असल्याने त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या सरकारने वस्त्रोद्योगाला वीजदरात सवलत दिली. बंद पडणार्‍या वस्त्रोद्योगाला हात देऊन उभे केले. पण हे लोक सत्तेत आल्यापासून येथील उद्योग दुसर्‍या राज्यांमध्ये नेत आहेत. त्यांनी यावेळी भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले की, तुम्ही मिंद्यांच्या नावाखाली निवडणूक लढवणार आहात का? हे एकदा जाहीर करा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मिंद्यांना 48 जागा दिल्या जातील, असे म्हटले आहे. अरे पण तुमच्या नावाप्रमाणे 52 तरी जागा द्या, असेही ते उपाहासाने म्हणाले. त्याचबरोबर भाजपची 152 कुळे जरी खाली आली तरी शिवसेना संपवू शकणार नाही. मोदींवर टीका करताना ते म्हणाले की, तुमचा नेताकिंवा मोदी म्हणजे भारत नाही. त्यामुळे मोदींचा अपमान हा भारताचा अपमान कसा? असा सवालही त्यांनी केला.
आम्हाला सत्ता गेल्याचे दु:ख नाही, पण आमचे सरकार गद्दारी करून पाडण्यात आले. ज्या आईने यांना राजकारणात आणले तिच्या कुशीत वार करून हे गेले. मी आजही त्यांना आव्हान करतो की, तुम्ही मोदींचा फोटो लावून निवडणूक लढवा, मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवतो. पाहूया लोक कुणाच्या मागे उभे राहतात, असे आव्हान त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणातून भाजपा आणि शिंदे गटाला केले आहे.

Scroll to Top