नाशिक – संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. लोणारवाडी गावातून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर संत निवृत्तीनाथांची दिंडी कुंदेवाडीत पोहोचली. कुंदेवाडीत दुपारचे जेवण वारकऱ्यांसाठी तयार करण्यात आले होते. यावेळी कुंदेवाडीच्या ग्रामस्थांनी दिंडीत सहभागी भाविकांच्या जेवणासाठी २५० लिटर गुळवणीसह २५ किलोचा आमरस तर ५ हजाराहून अधिक पुराणपोळ्यांचे जेवण तयार करण्यात आले होते.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. आजचा सहावा दिवस आहे. ठिकठिकाणी पाहुणचार स्वीकारत मजल दरमजल करत ही पालखी पुढे सरकत आहे. आज पालखीचा सिन्नर तालुक्यातील खंबाळेमध्ये मुक्काम असणार आहे. दुपारचे जेवण हे कुंदेगावी होणार असून जवळपास ६०वर्षांहून अधिक काळापासून या गावी दिंडीचा पाहुणचार करण्यात येतो. विशेष म्हणजे या गावची अनोखी परंपरा आहे. संपूर्ण गाव भगव्या पताकांनी सजले असून रस्त्यावर सडा रांगोळी काढत दिंडीचे स्वागत करण्यात आले. दरवर्षी संत निवृत्तीनाथांची पायी दिंडी सिन्नरमार्गे कुंदेवाडीत पोहोचते. दिंडी गावात येणार असल्याने वारकऱ्यांचा पाहुणचार करण्यासाठी यंदा आमरस पुरणपोळीचा बेत गावकऱ्यांनी आखला आहे. २५किलोचा आमरस, २५०लिटर गुळवणी, ५ हजाराहून अधिक पुरणपोळ्या तयार करण्यात आल्या. ही तयारी घरोघरी सुरु करण्यात आली होती. गावातील प्रत्येक घरातून २१ पुरणपोळी, एक तांब्या सार, १ ते ५ लिटर दूध आणि २१ रुपये वर्गणी काढली जाते. तयार केलेल्या या आमरस पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी घरोघरी वारकरी जेवायला जातात. काहींनी ग्रामपंचायत समोर मोकळ्या जागेत पुरणपोळीचा आस्वाद घेतला आहे.