सीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले

मुंबई – नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईच्या वरळीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचे रिपोर्ट कार्डच वाचून दाखवले. कोरोना साथीदरम्यान मोदी सरकारने ८० कोटी लोकांना मोफत अन्नाचे वाटप केले होते. तसेच देशभरातील लोकांना मोफत कोरोनाची लस दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य भाजपचे नेते उपस्थित होते. त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकारने १२ कोटी घरांपर्यंत स्वच्छ पाण्याची व्यवस्था पोहोचवली. ९.६० कोटी घरांपर्यंत मोफत गॅस कनेक्शन दिले. गरीब कुटुंबियांना २०० रुपयांची प्रती गॅससिलेंडर सबसिडी दिली. सरकारने गरीबांसाठी साडेतीन कोटींपेक्षा अधिक पक्के घरे बांधली. देशभरातील गावागावांत १२ कोटी शौचालये उभारली.

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, उज्ज्वला योजनेमुळे अनेक महिलांना मोठा फायदा झाला आहे. आवास योजनेअंतर्गत २५ लाख घराची बांधणी करण्यात आली. ५ लाख फेरीवाल्यांना मोदी सरकारकडून मदत करण्यात आली आहे. मुद्रा योजनेतून ४१ लाख उद्योजकांना फायदा झाला आहे. या योजनेचा नव्या उद्योजकांना मोठा फायदा झाला आहे. सुकन्या योजनेचा २३ लाख कुटुंबांना फायदा झाला, तर मोदी सरकारकडून ४ लाख कुटुंबांना दोन वर्षे मोफत धान्य देण्यात आले. मोदींच्या नेतृत्वात आयुष्मान योजनेंतर्गत ७ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात आले आहे. हे सरकार सामान्यांचा विचार करणारे सरकार आहे. युपीए सरकारची ओळख लकवा सरकार म्हणून होती. मोदी सत्तेत आल्यापासून देशाचा वेगाने विकास होत आहे. केंद्राच्या मदतीमुळे राज्यात विकास कामे सुरू असून, मोदीच्या नेत़त्वात नवा भारत घडतो आहे. मोदी सरकारच्या काळात वेगवान विकास सुरू असून, पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये थेट जातात असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top