मुंबई : आशियाई बाजारातील कमकुवत स्थिती तसेच अमेरिका, युरोपमधील बँकिंग संकटाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज मोठी पडझड पाहायला मिळाली. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३६१ अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १११ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज ०.६२ टक्क्यांची घसरण होऊन तो ५७,६२८अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज ०.६५ टक्क्यांची घसरण होऊन तो १६,९८८ अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज मोठी घसरण झाली.
सेन्सेक्समध्ये दुपारपर्यंत जवळपास ८०० अंकांची घसरण झाली होती. नंतर बाजार काहीसा सावरला आणि तो अंकांच्या घसरणीने बंद झाला. आज बाजार बंद होताना बजाज फिन्सर्व, अदानी इएन्टरप्राइझेस, बजाज फायनान्स, हिंडलको इंडस्ट्रीस आणि विप्रो च्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. एफएमसीजी क्षेत्र सोडले तर इतर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. आयटी, मेटल आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये एक टक्क्यांची घसरण झाली आहे.