मुंबई- सरकारी बँकांना गंडा घालून विदेशात पळून जाणाऱ्या उद्योजकांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. मुंबईच्या अंधेरी येथील यश ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे मुख्य प्रवर्तक आणि संचालक प्रमोद गोयंका यांनी स्टेट बँकेला ४०५.५८ कोटींना फसवून आफ्रिकेतील मोझांबिक देशात पलायन केले आहे. सीबीआयने या प्रकरणी गुन्ह्याचा कट रचणे, फसवणूक करणे आणि गैरव्यवहार अशा कलमांखाली गोयंका यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद गोयंका, आर. ए. टाटा, ए. एल. प्रभुदेसाई आणि अन्य अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांनी मिळून भारतीय स्टेट बँकेची नरिमन पॉइंट येथील शाखा आणि हल्लीच स्टेट बँकेत विलीन झालेली ई-स्टेट बँक ऑफ पटियाला या बँकांच्या माध्यमातून हा घोटाळा केला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी प्रकाश भारती नावाच्या एसबीआयच्या उप महाव्यवस्थापकाने कर्ज घेतलेली कंपनी आणि तिच्या संचालकांनी तसेच अनोळखी सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून बँकेला फसवण्याचा कट रचल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने पुढाकार घेऊन फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. त्यानुसार ३१ मार्च २०११ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर बँकेला मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आलेल्या कर्जातून अपेक्षित संपत्ती खरेदी करण्यात आली नव्हती. उलट तो पैसा अन्य कामासाठी वापरला गेल्याचे उघड झाले.
स्टेट बँकेला ४०५ कोटींचा गंडा! मुंबईतल्या उद्योजकाचे पलायन
