पुणे -हवाई वाहतूक क्षेत्रातील कार्बन निस्सारणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, स्वदेशी बनावटीच्या शाश्वत विमान इंधना (एसएएफ) चे मिश्रण वापरून भारतातील पहिले व्यावसायिक प्रवासी उड्डाण शुक्रवारी सकाळी यशस्वी पार पडले. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड (प्राज) यांच्याबरोबर भागीदारी करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पुरवलेले शाश्वत विमान इंधन (एसएएफ) मिश्रित एव्हिएशन टर्बाइन इंधनावर (एटीएफ) संचालित एअर एशियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला उड्डाण केले. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्ली विमानतळावर या विशेष विमानाचे स्वागत केले.
प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी म्हणाले, स्थानिकरित्या उत्पादित शाश्वत विमान इंधन वापरून उड्डाण करण्याची क्षमता दाखवणे, हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. ऊर्जा स्वातंत्र्य आणि हरित वाढीच्या दिशेने भारताच्या प्रवासात अन्नदाता ते उर्जादाता या मार्गाने शेतकर्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे हे आणखी एक उदाहरण आहे.