हनोई
व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना काल रात्री 11.30 वाजता घडली. या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अथक प्रयत्नानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी आज पहाटे 2 वाजता ही आग विझवली.
हनोईमध्ये अरुंद गल्लीत असलेल्या नऊ मजली इमारतीला अचानक आग लागली. आत आणि बाहेर जाण्यासाठी इमारतीमध्ये एकच मार्ग होता. या इमारतीत कोणताही आपत्कालीन मार्ग नसल्याने इमारतीत रहिवासी अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले. या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या इमारतीमधून 70 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 54 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप उघड झालेले नाही. दरम्यान याआधीही व्हिएतनाममध्ये आगीच्या अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आग कराओके बार सारख्या मनोरंजनाच्या ठिकाणी लागल्या. वर्षभरापूर्वी हो ची मिन्ह सिटी येथील तीन मजली कराओके बारमध्ये लागलेल्या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला होता. या आगीत 17 लोक जखमी झाले होते.
हनोईमध्ये इमारतीत आग 12 जणांचा होरपळून मृत्यू
